टार्गेट पूर्ण करण्यासाठी पाडलोस-केणीवाडा येथील 40 वर्षीय गवंडी कामगाराला आर्थिक प्रलोभन दाखवत नसबंदी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलिसांत धाव घेत मळेवाड आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांविरोधात तक्रार दिली आहे. नसबंदी केल्यानंतर घरी न सोडता या कामगाराला आरोस बाजारातच शासकीय वाहनातून आणून सोडण्यात आले. पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली असतांनाही पतीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ‘टार्गेट’साठी नसबंदी करणारे अडचणीत आले आहेत.
पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जानुसार, पाडलोस येथील एका गवंडी कामगाराला मळेवाड आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकाने 40 हजार रुपये मिळतील, असे
प्रलोभन दाखविले. गरीब परिस्थितीमुळे हा कामगार तयार झाला. मात्र, नसबंदी करण्यात येणार, असे त्याला सांगितले नव्हते. आरोग्य सेवकाने त्याच्या घरी जात त्याच्या पत्नीला ‘तुमच्या पतीचे आधारकार्ड व बँक पासबुक गवंडीचे जॉब कार्ड करण्यासाठी पाहिजे’, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी कागदपत्रे दिली. मंगळवारी सदर आरोग्यसेवक व अन्य दोन कर्मचाऱयांनी या कामगाराला गाठले. त्याला आपण कणकवलीला जाऊया, असे सांगितले. तसेच काम झाल्यावर काही दिवसात तुझ्या खात्यावर 40 हजार रुपये जमा होतील, असे सांगितले.
आरोस बाजारातच सोडले
सरकारी वाहनाने त्याला त्यांनी कणकवली येथील एका हॉस्पिटलमध्ये दुपारी एकच्या सुमारास नेले. तेथे कागदपत्रावर त्याच्या स्वाक्षऱया घेण्यात आल्या. त्यानंतर दुपारी शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शुद्धी आली. त्यानंतर त्याच सरकारी वाहनाने त्याला आरोस बाजारात सोडण्यात आले. घरी सोडण्याची विनंती करूनही ती अव्हेरण्यात आली. वेदना होत असतानाही त्याने एकाच्या दुचाकीवर बसून घर गाठले. रात्री नऊच्या सुमारास जेवणावेळी रक्तस्राव होत असल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यावेळी विचारपूस केली असता त्याने पत्नी व भावाला झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.
अज्ञानातून शस्त्रक्रिया-भावाचा आरोप
अज्ञानाचा व गरिबीचा फायदा घेऊन पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप सदर कामगाराच्या भावाने बांदा पोलिसांसमोर केला. तीन कर्मचाऱयांसह मळेवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कणकवली येथील खासगी दवाखान्याचे डॉक्टर या सर्वांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर कामगाराच्या पत्नीने बांदा पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर बांदा आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
आरोग्य विभागाला जाब विचारू – सरपंच खान
‘टार्गेट’साठी एखाद्याची नसबंदी करणे गैर आहे. या प्रकाराबाबत डॉ. खलिपे यांच्याशी बोलणे झाले आहे. जि. प. सदस्या तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्षा शर्वाणी गावकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांसमवेत गुरुवारी मळेवाड आरोग्य केंद्रात जाब विचारला जाईल. दोषींवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. कारवाई न झाल्यास आम्ही जाब विचारून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू, असा इशारा सरपंच अक्रम खान यांनी दिला आहे.
संबंधितांवर कारवाई होणार – डॉ. खलिपे
या प्रकरणी संबंधित आरोग्य सेवक आणि सहकारी यांच्यावर घटनेची पडताळणी करून योग्य कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले. या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता अभिवचन समितीतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. संबंधिताची संमत्ती नसतांना प्रलोभन दाखविल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असेही डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले. डॉ. खलिपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. संदीप कांबळे, डॉ. अदिती ठाकुर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी उशिरा पाडलोस-केणीवाडा येथे जात कामगाराची विचारपूस केली.