निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला असून, १६ मार्च रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला संख्याबळानुसार केवळ एक जागा येत असून, या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र, पवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र असून एका गटाने त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबईत पार पडलेल्या काँग्रेसच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या विषयावर प्राथमिक चर्चा झाली. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी वाढलेली कथित जवळीक पाहता शरद पवारांना ही संधी देऊ नये, असा सूर काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावला आहे. महाविकास आघाडीने यावेळी एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. जर ही जागा शरद पवारांना दिली आणि भविष्यात राजकीय विलीनीकरणाच्या चर्चांनुसार समीकरणे बदलली, तर आघाडीच्या हातातील ही एकमेव जागा महायुतीकडे जाण्याची भीती काँग्रेसमधील एका गटाला वाटत आहे. मात्र, या विरोधाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही आणि अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच पवारांच्या नावाचे संकेत दिले होते, तरीही शरद पवार स्वतः ही निवडणूक लढवणार का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. ८५ वर्षीय पवारांनी यापूर्वीच निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. त्यांचे वय आणि प्रकृती पाहता ते पुन्हा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नसल्यास महाविकास आघाडीला सर्वसंमतीने नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार, एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १३१, शिवसेनेचे ५७ आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार पाहता महायुतीचे सहा उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीला आपल्या एकमेव जागेसाठी एकजूट टिकवून ठेवावी लागणार आहे.



