पर्तगाळी येथे मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी नांदी दर्शन कार्यक्रम

0
46

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवानिमित्त दिनांक २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता जिवोत्तम मंडप पर्तगाळी येथे विशेष नांदी दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतून साकारलेली ही कलाकृती गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा अद्वितीय अनुभव रसिकांना देणार आहे. गोमंतकातील अनेक सारस्वत देवस्थानांतून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नाट्यपरंपरेत नांदी हा नाटकाचा मंगलारंभ मानला जातो. या परंपरेतील १५ देवस्थानांतील नांद्या तसेच संगीत नाटकांतील दोन प्रसिद्ध नांद्या संगीत शाकुंतल आणि संगीत मानापमान यांसह एकूण १७ नांद्यांचा भव्य कलाप्रयोग नांदी दर्शनमधून सादर होणार आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी  १५ देवस्थानांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

श्री  चामुंडेश्वरी देवस्थान देऊळमळ केपे
श्री  महालक्ष्मी देवस्थान बांदिवडे
श्री  नवदुर्गा देवस्थान मडकई
श्री  मोहिनी देवस्थान सदोळशे काणकोण
श्री महालक्ष्मी देवस्थान पणजी
श्री विमलेश्वर देवस्थान रिवण
श्री  देवकीकृष्ण देवस्थान माशेल
श्री वेताळ देवस्थान फातर्पा
श्री नागेश महारुद्र देवस्थान नागेशी
श्री  रामनाथ देवस्थान रामनाथी
श्री  लक्ष्मी मंदिर ट्रस्ट सांवरकट्टा कुंकळळी
श्री दामोदर देवस्थान जांबावली
श्री अश्वथ नारायण देवस्थान मोखर्ड काणकोण
श्री महालसा नारायणी देवस्थान मार्दोळ
श्री कामाक्षी देवस्थान शिरोडा.

या कार्यक्रमात गोमंतकातील तब्बल पाचशे पंचाहत्तर कलाकारांचा सहभाग असून सर्व कलाकारांची सादरीकरणे पारंपरिक संगीत वेशभूषा आणि नाट्यशैली यांच्या संगमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन योगीश सांबारी यांचे असून गोपाल प्रभु (ऑर्गन), दत्तराज शेट्ये (तबला), केदार धामस्कर (पखवाज), यतीन तळावलीकर (तालवाद्य), जितेंद्र बोरकर(रंगमंचव्यवस्था) व सूत्रसंचालन प्रा. भास्कर नायक करणार आहेत.
या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या भव्यतेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा आनंद समाजबांधवांना अनुभवता यावा यासाठी आयोजित करण्यात आलेला नांदी दर्शन हा कार्यक्रम गोमंतकातील समृद्ध नाट्यपरंपरेचा साक्षात्कार घडवणारा ठरणार आहे. सर्व रसिक भक्तगण आणि समाजबांधव यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here