प्रतिनिधी / रायगड
पनवेल महानगरपालिका हद्दीत विद्यार्थांचे अपहरण करणे, काही अज्ञात व्यक्तीकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करणे, दमदाटी करणे, नागरिकांची लुटमार करणे, सुनसान जागेमध्ये मद्यपान करणे तसेच अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. सदरच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाविद्यालय, काँलेज, शाळा, कोचिंग क्लासेस, आस्थापना यांना सीसीटीव्ही काँमेरे बसविण्याचे आदेश पनवेल महानगरपालिकेने दिले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात येणार आहेत.
शाळांमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराबाबत अलीकडे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. काही क्लास चालकांनी महानगरपालिका अधिनियमातील कलम ३७६ नुसार विवक्षित व्यवसाय परवाना प्राप्त केला नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. सीसीटीव्ही बसविण्याबाबत व विविध परवानग्या प्राप्न करण्याबाबत संबंधितांना पदनिर्देशित अधिकारी यांनी नोटीस घावी . याशिवाय अनेक क्लास चालक महानगरपालिका अधिनियमातील कलम २४४ व २४५ अन्वये जाहिरात परवानगी न घेता व्यवसायाची जाहिरात करत असतात. त्यांच्यावर महाराष्ट्र मालमत्ता वापरास प्रतिबंध अधिनियम, १९९५ च्या कलम ३ अन्वये व अनुषंगिक कायदे व नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेशही देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कँमेरा हे तिसरे नेत्र असून त्यामुळे अनेक गुन्हाची उकल होवून गुन्हेगारीला आळा बसणार आहे याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. या आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (.वर्तणूक) नियम १९७९ व महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ व ७२ ( क) अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे महानगरपालिकेन काढलेल्या आदेशात म्हटले आहे.