सिंधुदुर्ग – नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेचे नावच काढू नका,त्यांचा पैसे कमावणे हा एकमेव धंदा आहे.काल काय बोलतील आणि आज काय बोलतील सांगू शकत नाही.८० टक्के पाठींबा म्हणजे तो शंभर टक्के झालाच.त्यामुळे शिवसेनेचे हे घुमजाव आहे. स्थानिक जनतेची ही फसवणूक आहे.मात्र आमचे त्यांच्या सारखे नाही. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पा बद्दल जनतेची जी भूमिका असेल ती आमची भूमिका राहील ,स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे सांगितले.
विजयदुर्ग किल्ला पडझड पाहणी दरम्यान खासदार राणे विजयदुर्ग येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, माजी.आमदार आजीत गोगटे,जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,तालुका अध्यक्ष रवींद्र पाळेकर,जिल्हा परिषद सभापती सावी लोके, सभापती सुनील पारकर,माजी सभापती संजय बोंबडी, सरपंच प्रसाद देवधर, नगराध्यक्ष प्रणाली माने, तहसीलदार मारुती कांबळे,जिल्हा सचिव अरब बगदादी,युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे, महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे, जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे, पंचायत समिती सदस्य शुभा कदम,प्रकाश राणे,उपसरपंच महेश बिडये, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर,स्थानिक अध्यक्ष ग्रेसीस फर्नांडिस, प्रदीप सारखरकर, आदींसह बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
नाणार रिफायनरी प्रकरणी सध्या कोकणात मोठे वादळ उठले आहे. शिवसेना भाजपा पक्षाचे नेते एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडात आहेत. देवगड पंचायत समितीने नाणार रिफायनरी समर्थनार्थ ठराव पास केला असून त्याला शिवसेनेच्या एकमेव सदस्याने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला आता चांगलाच रंग चढला आहे. तर शिवसेनेची या प्रकल्पाबाबत नेमकी भूमिका काय असा प्रश्न देवगड वाशियांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान खासदार नारायण राणे यांनी आपण जनतेच्या भूमिकेसोबत राहणार असल्याचे सांगत नानार रिफायनरीचा चेंडू तसा जनतेच्या कोर्टात टोलवलेला दिसतो. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो याबरोबरच नाणार रिफायनरी प्रकल्पाला येथील जनता कसा प्रतिसाद देते हे येणाऱ्या काळात समजेल.



