सिंधुदुर्ग – गेल्या दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे ठाकरे सरकार शेतकरी विरोधी नव्हे, तर शेतकरीद्रोही आहे, असा घणाघाती आरोप करीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रावर असंख्य नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. कोरोनासारख्या महामारीत बेपर्वाईमुळे अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांना मदतीची घोषणा करून त्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली.
निसर्ग चक्रीवादळात पुरता उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील शेतकऱ्यास मदत देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, उलट मदत मिळाली किंवा नाही याचाही थांगपत्ता नसल्याची कबुली देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली.
दुसऱ्या टाळेबंदीत रोजगार बुडालेल्या हजारो कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्राकडे बोटे दाखवत नाकर्त्या ठाकरे सरकारने ती जबाबदारीदेखी टाळली.
नंतरच्या तौक्ते चक्रीवादळात केवळ धावता दौरा करून मदतीचे गाजर दाखवत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या वादळग्रस्तांनाही वाऱ्यावर सोडले, आणि आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून, उस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.