दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम? शशिकांत शिंदे म्हणतात, ‘आम्ही आता पक्ष उभारणीवर लक्ष देणार’

0
4

मुंबई-अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत असून, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अजित पवार जिवंत असतानाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतचा निर्णय झाला होता, असा दावा शिंदेंनी केला असला तरी, आता हा विषय त्यांच्याकडून पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विलीनीकरणाबाबतची चर्चा स्वतः अजित पवार यांनीच सुरू केली होती आणि त्यांच्या पक्षातील अनेक जण या प्रक्रियेत सहभागी होते. मात्र, शरद पवार गटच विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दादांची जी शेवटची इच्छा होती, ती पूर्ण व्हावी हीच आमची भावना होती आणि त्याबद्दल आम्ही केवळ सत्य परिस्थिती मांडली होती. परंतु, आता या विषयावर अधिक चर्चा न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून पुन्हा जोमाने पक्ष उभा करण्यावर आमचा भर असणार आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध आहे का, या प्रश्नावर बोलताना शिंदेंनी सावध पवित्रा घेतला. संबंधित नेत्यांनी त्यांची भूमिका स्वतः मांडावी, असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. तसेच विलीनीकरणानंतर महायुतीसोबत जायचे की अजित पवारांनी एनडीएतून बाहेर पडायचे, हे सर्व जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आता पुढील राजकीय दिशा काय असेल आणि एनडीएसोबत कायम राहायचे की नाही, याचा संपूर्ण अधिकार सुनेत्रा पवार यांचा असल्याचे सांगत शिंदेंनी विलीनीकरणाच्या प्रकरणावर तूर्तास पडदा टाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here