सिंधुदुर्ग – कोविड – 19 मुळे दोन्ही पालक मृत असणाऱ्या 18 वर्षाखालील बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा जिल्ह्यातील 7 बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 दिवसात शासनाकडे पाठवावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.
कोविड – 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाविधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष पी.डी. देसाई, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी विषय वाचन करून सविस्तर माहिती दिली. कोविड 19 मुळे दोन्ही पालक मृत झालेले 7 बालक असून एक पालक मृत बालके 102 आहेत. तसेच विधवा महिलांची संख्या 116 आहे.
अपर जिल्हाधिकारी श्री. जोशी म्हणाले, ज्या बालकांचे आधार कार्ड नाहीत त्याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची पत्र पाठवून संपर्क करावा. आधार कार्ड काढून देण्याच्या सूचना देऊ. त्याचबरोबर मालमत्ता हक्क आबाधित राहण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे, ग्रामपंचायत यांच्याशीही पत्रव्यवहार करावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबाबत विधवा महिलांसाठी संबंधित तहसिलदार, जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाशी पत्र पाठवावे. जिल्ह्यातील 7 बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव प्राधान्याने पूर्ण करण्यात यावा. त्यासाठी पालकांचा मृत्यू दाखला, बालकांचा जन्म नोंदणी दाखला, आवश्यक कागदपत्रांसाठी संबंधित गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी संपर्क साधावा. त्याबाबत त्यांना सूचना दिल्या जातील.
कोविड काळात अवैधरित्या दत्तक प्रकरण आणि बाल विवाह रोखण्यासंदर्भात प्रत्येक तालुका पातळीवर जनजागृतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने पोस्टर्स लावावेत. व्हॉट्स ॲपवर येणारी सर्वच माहिती खरी नसते. तिची खात्री करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. त्याबाबत अधिकृत योग्य माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध करावी, असेही ते म्हणाले.