सिंधुदुर्ग – दोडामार्ग मणेरी येथील नदीत बुधवारी हरवळे साखळी गोवा येथील प्रकाश रामप्रिया शर्मा (53) यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला वाहून आलेली दुचाकी काठावर दिसल्याने आजूबाजूला शोधाशोध केली असता हा प्रकार निदर्शनास आला. दोडामार्ग पोलीस मयत शर्मा यांच्या नातेवाईकांच्या ओळखीपर्यंत पोहोचले असून घात, अपघात की आत्महत्या याबाबत तपास सुरू आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दोडामार्ग- सावंतवाडी मार्गावर मणेरी येथे असणाऱया नदीत मृतदेह आढळून आला. मृतदेहासोबत आढळलेल्या कपडय़ांमध्ये आधारकार्ड, मतदान ओखखपत्र आढळून आल्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. शर्मा यांचा मुलगा गोव्यात असल्याने त्याने बुधवारी सायंकाळपर्यंत आपण दोडामार्ग पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेहाची ओळख व पोलिसांच्या तपासाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
मणेरी नदीच्या काठावर काळय़ा रंगाची ऍक्टिव्हा ही दुचाकी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील संजय गवस यांना सांगितले. पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती दोडामार्ग पोलीस अनिल पाटील यांना दिली. पाटील हे घटनास्थळी हजर झाले. दुचाकी निदर्शनास आल्यानंतर आजुबाजूचा परिसर पोलीस व ग्रामस्थांनी पालथा घातला. दुचाकीच्या जवळपास 100 मीटर अंतरावर जीवन प्राधिकरण बंधाऱयाला अडकलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असणारा मृतदेह दृष्टीस पडला.
मृतदेह निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील यांनी ग्रामस्थांचे सहकार्य मागितले. त्यानंतर ग्रामस्थ सज्जन धाऊसकर, अरुण ठाकुर, लक्ष्मीकांत करमळकर, आबा करमळकर, अमोल नाईक, अंकुश सावंत, दिलीप पारसकर यांनी एकमेकांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला. पाण्याच्या प्रवाहाचा झोत पाहता मोठय़ा शिकस्तीने मृतदेह बाहेर काढला अन्यथा वाहून जाण्याची शक्यता होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, हवालदार अनिल पाटील, नाईक व होमगार्ड ही मदतीला उपस्थित होते. शर्मा यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.
शर्मा यांच्या आधारकार्ड व मतदान ओळखपत्रावर गोव्याचा पत्ता असला तरी ते दोडामार्ग येथे भाडय़ाने राहत होते. दोडामार्ग तिलारी मार्गावर अलीकडेच त्यांनी गॅरेज दुकान घातले होते, अशी माहिती दोडामार्ग पोलिसांना मिळाली असून शर्मा यांचे नातेवाईक आल्यावरच अधिक माहिती सविस्तरपणे मिळू शकणार आहे.



