दापोली-तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घरफोड्यांपाठोपाठ आता चोरट्यांनी आपला मोर्चा तालुक्यातील पवित्र देवस्थानांकडे वळवला आहे. दाभोळजवळील गोमराई येथील चंडिकानगर परिसरातील चंडिकादेवी मंदिर आणि कालिका देवी मंदिर या दोन प्रसिद्ध मंदिरांमध्ये भरदिवसा चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अज्ञात चोरट्याने मंदिराचे दरवाजे बंद असताना आत प्रवेश करून जड वजनाच्या पितळी घंटा व सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद होऊ नये, यासाठी चोरट्याने ‘बि प्रो ८०’ कंपनीचा कॅमेरा ५६ जीबी मेमरी कार्ड व जिओ सिमकार्डसह चोरून नेला.
तसेच पितळी घंटा (सुमारे २० किलो) – ₹४०,००० पितळी घंटा (सुमारे १५ किलो) – ₹३०,००० पितळी घंटा (सुमारे १० किलो) – ₹२०,००० ‘बि प्रो ८०’ सीसीटीव्ही कॅमेरा (५६ GB मेमरी कार्ड व जिओ सिमकार्डसह) – ₹६,००० एकूण मुद्देमाल ₹९६,००० चा आहे.
या प्रकरणी फिर्यादी सुभाष भिकाजी घुबडे (वय ४६, रा. चंडिकानगर, गोमराई) यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १:५४ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३) अन्वये गु.र.नं. ०९/२०२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.



