देवगड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; १४ पैकी ११ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा

0
4

देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या देवगड पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे जोरदार मुसंडी मारत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार, तालुक्यातील एकूण १४ गणांपैकी ११ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवून विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला असून त्यांचा केवळ एक उमेदवार विजय मिळवू शकला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

या निवडणुकीत पुरळ गणातून भाजपच्या संजना आळवे यांनी विजयाचे खाते उघडले, तर तीर्लोट गणातून रवींद्र तीर्लोटकर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पडेल गणात अंकुश ठुकरूल आणि नाडण गणात गणेश राणे या भाजप उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून पक्षाची पकड अधिक मजबूत केली. बापर्डे गणातून भाजपच्या संजना लाड विजयी झाल्या, तर पोंभुर्ले गणात सादिक डोंगरकर यांनी कमळ फुलवले. फणसगावमध्ये समृद्धी चव्हाण, शिरगावमध्ये शितल तावडे आणि किंजवडे गणातून स्नेहा अनभवने या भाजपच्या रणरागिणींनी विजयश्री खेचून आणली. कोटकामते गणातून ऋतुजा खाजनवाडकर आणि मुणगे गणातून सदाशिव ओगले यांनी विजय मिळवत भाजपच्या विजयाचा रथ ११ व्या जागेपर्यंत नेऊन पोहोचवला.

दुसरीकडे, विरोधकांच्या गोटात मोठी शांतता पाहायला मिळाली. संपूर्ण तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकमेव उमेदवार विष्णू घाडी यांनी मणचे गणातून विजय मिळला. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन जागांवर यश मिळवले असून, तळवडे गणातून सलोनी तळवडेकर आणि कुणकेश्वर गणातून अमोल लोके विजयी झाले आहेत. एकूणच देवगड पंचायत समितीवर पुन्हा एकदा कमळ फुलले असून भाजपच्या या एकतर्फी विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here