कोरोनाचा सर्वात मोठा फटका आंबा बागायतदारांना बसू लागला आहे. देवगड हापूस आंबा हंगाम सुरू झाला. मात्र, कोरोनामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आंब्याला ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. आंब्याची वाहतूक करण्यासाठी जिल्ल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला आहे. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर मुंबई- वाशी मार्केटला जाणारा आंबा यावर्षी मात्र संकटात सापडला आहे.
आंबा हे नाशवंत फळ असल्याने आंबा तोडणी झाल्यांनतर व आंबा तयार झाल्यानंतर त्याची वेळेत विक्री होणे आवश्यक असते. यावर्षी अवकाळी पावसामुळे आंबा हंगामाला उशीर झाला. आता आंबा हंगाम सुरू झाला आणि कोरोनाचे संकट जगावर आले. त्यामुळे आंबा निर्यातीवर मोठी संक्रात आहे. रत्नागिरी व देवगडमध्ये मोठय़ा प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हंगाम सुरू झाल्याने झाडांवर मोठय़ा प्रमाणात आंबा तयार झाला आहे. तयार झालेला आंबा काढण्यासाठी आंबा बागायतदार तयार आहेत. पण, आंबा वाहतुकीची व्यवस्था अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आंबा बागायतदारही चिंतेत आहेत.
आंबा बागायतदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी आमदार नीतेश राणे यांनी डिमार्ट मॉलच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानुसार डिमार्ट व्यवस्थापनाने आंबा खरेदीची तयारी दर्शविली आहे. तसेच अन्य कंपन्यांशीही आमदार राणे संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंबा वाहतुकीला अडचण येऊ नये, यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची पास उपलब्ध करून देण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. देवगडमध्ये आंबा वाहतुकीसाठी अडचण होऊ नये, यासाठी देवगड तहसील कार्यालय येथे प्रीतम पोवार या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



