‘देवखेळ’ वेबसीरिजवर बंदी घाला; भास्कर जाधवांचा इशारा

0
20

रत्नागिरी : कोकणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा कणा असलेल्या ‘शिमगा’ उत्सवातील अत्यंत आदराचे पात्र असलेल्या ‘संकासुरा’चे विकृत चित्रण केल्याचा गंभीर आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. झी ५ (ZEE5) वर प्रसारित होत असलेल्या ‘देवखेळ’ या वेबसीरिजमध्ये संकासुराचे अपमानास्पद चित्रण करण्यात आले असून, या मालिकेवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार जाधव यांनी निवेदनात स्पष्ट केले की, संकासूर हे केवळ करमणुकीचे साधन नसून, तो शिवाचा अवतार मानला जातो. काळ्या रंगाचा पोशाख, मुखवटा आणि हातात वेत घेऊन गावागावात फिरणारा संकासूर हा कोकणी माणसासाठी श्रद्धेचा विषय आहे. मात्र, ‘देवखेळ’ वेबसीरिजमध्ये या भक्तीमय पात्राला क्रूर आणि खूनी प्रवृत्तीचे दाखवून जाणीवपूर्वक हिंदू लोकश्रद्धांना तडा देण्याचे काम करण्यात आले आहे. ही बाब कोकणातील कुणबी समाज आणि तमाम कलाकारांचा अपमान करणारी आहे.

या वादाला आणखी एक गंभीर वळण लागले आहे. या मालिकेचे चित्रिकरण गुहागर तालुक्यात झाले असून, “आम्ही संकासुरावर डॉक्युमेंटरी (माहितीपट) तयार करत आहोत,” असे सांगून स्थानिक लोकांची दिशाभूल करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीची वेबसीरिज चित्रित करून लोकांच्या विश्वासाला तडा दिला गेल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण कोकणात, विशेषतः नमन आणि भजन मंडळांच्या कलाकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुहागर पोलीस ठाण्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास जनभावनेचा उद्रेक होईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here