दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन

0
4

मुंबई- दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने प्रसारमाध्यम क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दूरदर्शननेही ‘एक्स’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या निधनाची माहिती देत आदरांजली वाहिली आहे.

आवाज आणि प्रभावशाली सादरीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सरला माहेश्वरी यांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. १९८० आणि १९९० च्या दशकात त्या टीव्ही मीडियातील सर्वात लोकप्रिय चेहरा होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडली होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट कार्यक्रम आणि विशेष प्रक्षेपणांच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

सरला माहेश्वरी यांनी २००५ पर्यंत दूरदर्शनमध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम केलं. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पीएचडी (PhD) पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनमध्ये ऑडिशन दिलं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘अनाउंसर’ (निवेदिका) म्हणून केली आणि पुढे त्या ‘न्यूज रीडिंग’ (वृत्त वाचन) करू लागल्या.

दूरदर्शनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “दूरदर्शन परिवाराच्या वतीने श्रीमती सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या दूरदर्शनच्या एक सन्माननीय आणि प्रतिष्ठित वृत्त निवेदिका होत्या. त्यांनी आपल्या सौम्य आवाजाच्या, अचूक उच्चारांच्या आणि सादरीकरणाच्या जोरावर भारतीय वृत्त जगतात एक विशेष स्थान निर्माण केलं. त्यांच्या साधेपणाने आणि संयमी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचा विश्वास संपादन केला होता.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here