दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकज या मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 2 तर रत्नागिरी जिल्ह्यातून ८ ते १० जण गेल्याचे समोर येत आहे. यातील २ जण रत्नागिरी शहरातील असून त्यांना मंगळवारी ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गात दोघांना बुधवारी ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, या वृत्ताने सिंधुदुर्ग, रत्नागिरीत एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आधीच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातल्या शृंगारतळी गावातील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या रुग्णावर उपचार केल्यानंतर त्याच्या आतापर्यंतच्या २ टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी कोरोना मुक्त होत असताना आता एक खळबळजनक बातमीने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीघी जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या तबलीघी जमातीच्या लोकांमध्ये करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात रत्नागिरीतील ८ ते १० जण सहभागी झाल्याचे समोर आले आहे. यापैकी दोघांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन उपचार सुरु केले आहेत. हे दोघेजण ७ मार्चला निजामुद्दीन येथे पोचले. १० मार्चपर्यंत ते तिथे होते. त्यानंतर १२ मार्चला ते दिल्लीतून अहमदनगर येथे आले व तिथून १३ मार्चला ते रत्नागिरीत पोचलेत. पोलीस अन्य लोकांचा शोध घेत आहेत. दरम्यान या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.