कोकणातील पारंपारिक शेतीला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘महाॲग्री-एआय’ धोरणांतर्गत (२०२५-२०२९) राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्याचे निश्चित केले आहे. या धोरणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी रत्नागिरी जिल्ह्यासाठी असून, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आता एक विशेष ‘एआय इनक्युबेशन केंद्र’ उभारले जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. कोकणचा विचार करता, इथली भौगोलिक परिस्थिती आणि पिकांची पद्धत वेगळी आहे. हाच धागा पकडून दापोली कृषी विद्यापीठात होणारे हे केंद्र कोकणातील आंबा, काजू, सुपारी आणि नारळ अशा महत्त्वाच्या बागायती पिकांवर लक्ष केंद्रित करेल.
या केंद्रामुळे शेतीमध्ये केवळ मानवी श्रमावर अवलंबून न राहता रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची पाहणी करणे सुलभ होणार आहे. उदाहरणार्थ, बागेतील कोणत्या झाडाला पाणी हवे आहे किंवा कोणत्या झाडावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, याची अचूक माहिती हे तंत्रज्ञान देऊ शकेल. हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, नवीन स्टार्टअप्सना जन्म देणारे केंद्र म्हणूनही ओळखले जाईल. कोकणातील तरुण शेतकरी किंवा तंत्रज्ञ जे शेती क्षेत्रासाठी नवनवीन शोध लावू इच्छितात, त्यांना या केंद्रामार्फत मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधा मिळतील. तसेच, उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या भू-स्थानिक माहितीचा वापर करून हवामानातील बदल आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम याचे अचूक अंदाज वर्तवणे आता अधिक सोपे होणार आहे.
राज्यातील चार महत्त्वाच्या कृषी विद्यापीठांमध्ये हे प्रकल्प राबवले जात असून, दापोलीचे हे केंद्र राज्यस्तरीय मुख्य केंद्राशी (AIAIC) थेट जोडलेले असेल. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान थेट कोकणच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. शासनाच्या या निर्णयामुळे कोकणातील कृषी क्षेत्राचे केवळ आधुनिकीकरणच होणार नाही, तर उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



