मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) नेतृत्वाच्या चर्चांवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज दिल्लीत महत्त्वपूर्ण भाष्य केले. “आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्याशिवाय (माझ्या मार्गदर्शनाखाली) घेणार आहोत,” अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील रचनेबाबत स्पष्टोक्ती दिली.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत पटेल यांनी पक्षाच्या संघटनात्मक बदलांवर भाष्य केले. आगामी काळात अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल आणि पक्षाच्या नेतृत्वाबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र, अजितदादांनंतर काय? कुठे? आणि कसे? ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि संघटनात्मकदृष्ट्या पूर्ण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आहे. ती मी अत्यंत योग्य रीतीने पार पाडत आहे.”
पटेल यांनी या विधानातून हे संकेत दिले आहेत की, पक्षात मोठे फेरबदल होणार असले तरी त्याचे सूत्रसंचालन त्यांच्याकडेच असेल. “पक्षांतर्गत लोकशाहीचा मान राखून सर्व निर्णय घेतले जातील. यामध्ये कोणाच्याही मनात शंका राहण्याचे कारण नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या पत्रकार परिषदेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सत्तेच्या केंद्रस्थानी कोण असेल, याबाबतच्या चर्चांना आता उधाण आले आहे.



