छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यावर टीकाही होत आहेत. या सर्व प्रकरणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा स्वातंत्र्यसैनिक यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. देशातच नव्हे तर जगातही त्याची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी आपली तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी व्हावी, असे सांगितले नसावे. अतिउत्साही कार्यकर्त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अतिउत्साही कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांनी आवरावे.
ते पुढे म्हणाले की, ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाने अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. तसेच या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबवावे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी बोलताना केली.