सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीच्या पाण्याची पातळी 41.20 मीटर इतकी झालेली आहे. तिलारी नदीची इशारा पातळी 41.60 मीटर इतकी असून धोका पातळी 43.60 मीटर आहे. तसेच तिलारी धरणाची पाणी पातळी 110.10 मीटर इतकी झालेली आहे. तिलारी नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे तिलारी नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.
हवामान विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. संबंधित गावातील नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये-जा करु नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी सतर्कता बाळगावी.संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींनी सखल भागात राहणाऱ्या तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या व्यक्तींबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. पाणी पातळीत वाढ झाल्यास तातडीने संबंधित नागरिकांना स्थलांतरीत करण्यात यावे.



