भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ज्या डॉक्टरला रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत मानले जाते, त्याच डॉक्टरने केवळ पैशांच्या हव्यासापोटी एका १० दिवसांच्या निरागस चिमुकलीची ३ लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोंदियातील बालाजी हॉस्पिटलचे डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिला आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला मिळालेल्या एका गोपनीय माहितीमुळे झाला. पांढराबोडी गावात एका महिलेकडे अवघ्या १० दिवसांचे बाळ असल्याची माहिती मिळताच अधिकारी चौकशीसाठी तेथे पोहोचले. पथकाला पाहताच संबंधित महिलेने बाळासह पळ काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत बाळाला सुरक्षित ताब्यात घेतले आणि कसून चौकशी सुरू केली असता, तपासाचे धागेदोरे थेट गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलपर्यंत पोहोचले.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एका गरीब दाम्पत्याने आपल्या १० दिवसांच्या मुलीला उपचारासाठी डॉ. नितेश बाजपेयी यांच्याकडे दाखल केले होते. मात्र, डॉक्टरने उपचाराचा खर्च खूप जास्त होईल अशी भीती पालकांना घातली. त्यानंतर नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत उपचार करून देतो, अशी खोटी बतावणी करून डॉक्टरने पालकांकडून बाळ स्वतःच्या ताब्यात घेतले. प्रत्यक्षात मात्र उपचाराचे नाटक करून या डॉक्टरने एका मध्यस्थ महिलेमार्फत भंडाऱ्यातील एका कुटुंबाला या चिमुकलीची ३ लाख रुपयांत विक्री केली. या व्यवहारातील १ लाख रुपये रोख आणि १ लाखाचा धनादेश मध्यस्थ महिलेच्या खात्यात जमा झाला होता, तर उर्वरित रक्कम ५ फेब्रुवारीला दिली जाणार होती.
या अघोरी कृत्याने संपूर्ण विदर्भात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबीचा गैरफायदा घेऊन रुग्णालयात आलेल्या बाळांची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध आता भंडारा पोलीस घेत आहेत. सध्या मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी आणि त्याचे इतर तीन साथीदार फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.



