सिंधुदुर्ग – आपले इवलुसे पंख पसरून सारं राज्य, राज्यातील सर्व जिल्हे आपल्या कवेत घेण्यासाठी निघालेली एक निसर्गकन्या म्हणजेच प्रणाली चिकटे. ‘महाराष्ट्राची ग्रेटा’ हे उपनाम तिला अगदी चपखल जुळतं अशी ही प्रणाली. मु. पो. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ येथून प्रवास करत करत ती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली या तालुक्याच्या शहरात येऊन पोहोचलीय. या साऱ्या साडे आठ हजार किलोमीटरच्या प्रवासात तिच्यासोबत आहे, ती तिला प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक वळणावर साथ देणारी तिची सखी, एक ‘सायकल’!
वय वर्ष २१. शिक्षण BSW. आधीपासूनच पर्यावरणाची आवड. निसर्गासोबत हितगुज घालत वाढलेली ही निसर्गकन्या. या निसर्गाचा जवळून अभ्यास करत असताना तिला जाणवलं, की निसर्ग खूप बदलतोय. तापमानवाढ त्यामुळे वातावरणात, ऋतुचक्रात होणारा बदल, सभोवतालचे वाढते प्रदुषण यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याचा आणि शेतीच्या समस्या खुप वाढत आहेत. यावर आपण काही करू शकतो का! असा विचार तिच्या मनात आला आणि सुरु झाला एक ध्येयवेडा प्रवास. आपल्या स्वखर्चाने घेतलेल्या सायकलसोबत संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं, तिथल्या लोकांना वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांबाबत, निसर्गाच्या संगोपनाबाबत जागृत करायचं, वेगवेगळ्या भागातल्या निसर्गाचा आणि माणसांचा अभ्यास करायचा, स्थानिक पर्यावरणाविषयी जाणून घ्यायचं असं ठरवून तिचा हा सायकल प्रवास सुरु झाला. महत्त्वाचं म्हणजे ती हा महाराष्ट्र दौरा एकट्यानं करतेय. कूठल्या शासकीय संस्थेमार्फत ती निघाली नाही किंवा कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशीप नाही. तिचा हा प्रवास स्वतःच्या जबाबदारीवर सुरु केलेला प्रवास आहे. या प्रवासात ती जिथे जाईल, तिथले लोकच तिला मदत करतात. राहण्या-खाण्याच्या सोईसोबत काहीजणं आर्थिक मदतही करतात. एक मुलगी असून तिनं शारीरिक, सामाजिक समस्यांची पर्वा न करता सुरु केलेला हा प्रवास अनेकांना स्फुर्तीदायक असाच आहे. तिच्या प्रवासाच्या मुक्कामात ती महिला सक्षमीकरणावर विशेष भर देते. आपली इच्छाशक्ती जर दांडगी असेल, तर कोणताच अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही, याचं प्रणाली हे एक उत्तम उदाहरण…!
२० ऑटोबर, २०२१ रोजी यवतमाळ मधील पुनवट या गावापासून सुरु झालेला तिचा प्रवास आता ९००० किलोमीटर पर्यंत जावून पोहोचलाय. या प्रवासात तिने २० जिल्हे आपल्या सायकलने पार केलेत. काल दि. १ जून रोजी ती कणकवलीत दाखल झाली. उद्या दि. ३ जून रोजी ती सावंतवाडीकडे प्रस्थान करेल आणि तिथून कोल्हापूर प. महाराष्ट्र आणि पुढे मराठवाडा… या प्रवासात तिनं अनेक ठिकाणं बघितली, अनेक माणसं अगदी जवळून पाहिली. तिथलं काही चांगलं घेत आणि आपल्यातलं काही चांगलं देत तिचा प्रवास निरंतर चालू आहे. कोरोनाच्या या महाभयंकर काळातही तिची ही जिद्द कायम आहे. खरंतर कुटुंबाच्या पाठींब्यामुळेही ती इथपर्यंतचा प्रवास करू शकलीय.
आपल्या आरोग्यासाठी, ध्वनी प्रदूषण सायकलचा वापर करूया. प्लास्टिकचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करूया. झाडे लावूया, झाडे जगवूया. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपणच पुढे होवूया. पाणी वाचवूया, निसर्ग वाचवूया, स्त्री-पुरुष एकत्र येऊन नव्या बदलासाठी प्रयत्न करूया’, असे अनेक संदेश देत ती गावोगावी फिरतेय. येणाऱ्या संकटाला एकट्याने धैर्याने तोंड देतेय. तिच्या या आगळ्यावेगळ्या सफरीला ‘आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज’ कडून भरभरून शुभेच्छा. तिचा हा प्रवास लोकांमध्ये नक्कीच बदल घडवेल, अशी आशा आहे.



