कणकवली : कोकणातील जल, जंगल आणि जमिनींमुळे येथील जैवविविधता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आजही टिकून आहे. मात्र आर्थिक फायद्यासाठी काही मंडळी कोकणातील नैसर्गिक संपत्ती धनदांडग्यांच्या हाती देत असल्याची गंभीर बाब आहे. गोव्यापाठोपाठ आता कोकणावरही परप्रांतियांचा डोळा असून, कोकणवासीयांनी परप्रांतियांना जल, जंगल आणि जमिनी विकू नयेत, असे आवाहन पर्यावरणप्रेमी ‘रान माणूस’ प्रसाद गावडे यांनी केले.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोपुरी आश्रम, गोपुरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महानगरांतील प्रदूषण व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तेथील धनदांडगे निसर्गरम्य कोकणाकडे वळत असून, जमिनी विकत घेऊन कोकण ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गावडे यांनी सांगितले. कोलझर गावाने परप्रांतियांना जमिनी न विकण्याचा ठराव घेतला असून, इतर गावांनीही हा आदर्श स्वीकारावा, असे त्यांनी नमूद केले.
कोकणाचा विनाश करणारे प्रकल्प रोखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासाठी ‘राखणदार’ ही चळवळ सुरू करण्यात आली असून, या चळवळीत कोकणवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



