जमीन विकायची नाही हा ठाम निश्चयच खरी ताकद: जेष्ठ विधीज्ञ संदीप निंबाळकर

0
3

दोडामार्ग: जर स्वतःची जमीन विकायची नाही असा ठाम निश्चय मनाशी पक्का असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या वडिलोपार्जीत मालमत्तेवर घाला घालू शकत नाही, कारण कायद्याचे संरक्षण, गावाचे ऐक्य आणि दृढ निश्चय हीच आपली खरी ताकद आहे, असे प्रतिपादन जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी कोलझर येथे केले. कोलझर ग्रामस्थांनी आपल्या जमिनी न विकण्याचा सामूहिक निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदेविषयक संवाद उपक्रमात ते बोलत होते. पर्यावरण संवर्धन आणि जमिनीवर आधारित लोकजीवन जपण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.

सध्याच्या काळात जमिनी खरेदीसाठी बाहेरील घटकांकडून दबावतंत्र वाढत असताना, त्याला विरोध करण्यासाठी कोलझरवासियांनी एकजुटीने लढा उभारला आहे. यावर भाष्य करताना अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले की, पूर्वजांनी जपलेली ही संपत्ती पुढील पिढीकडे सुरक्षितपणे सुपूर्द करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. गावकरी जर एकत्र राहिले, तर कोणतीही धनशक्ती त्यांच्यासमोर यशस्वी ठरणार नाही. कोलझर ग्रामस्थांनी घेतलेल्या या भूमिकेचे राज्यभरातून स्वागत होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर गावांनीही याचे अनुकरण केल्यास जिल्ह्याचे निसर्गवैभव कायम टिकून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कायदेविषयक संवाद कार्यक्रमाला कोलझर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई यांच्यासह हिरबा उर्फ आपा देसाई, महादेव देसाई, विश्वास देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, बाळा देसाई, विकास सावंत, डी. बी. देसाई, सुदेश देसाई, देवेंद देसाई, मुरारी मुंगी, अनिल देसाई आणि प्रभाकर देसाई यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here