छत्रपतींच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना यादवाडचे शिल्प – इतिहास संशोधक इंद्रजित सावंत

0
339

सिंधुदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्री विषयक धोरणाचा उत्तम नमुना कर्नाटकातील यादवाड येथील शिल्प आहे. या शिल्पाला भेट देऊन इतिहास जाणून घेतल्यास महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन किती विशाल होता हे दिसून येते, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त आज ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. श्री. सावंत म्हणाले, दक्षिण दिग्विजयावरून महाराज परतताना वाटेत असणाऱ्या बेलवड्याच्या येसाजी प्रभू देसाई याने राजांचे अन्नधान्य वाहून नेणारे बैल पळवून नेले. या देसायाला समज देऊन बैल परत आणण्याची जबाबदारी सखुजी गायकवाड या सरदारावर महाराजांनी सोपवली. या लढाईत देसाई मारला गेला. परंतू त्याची पत्नी मल्लाबाई हीने लढा सुरूच ठेवला होता. सरदार गायकवाड यांनी मल्लाबाईचा अपमान केला आणि तिला कैद करून वाईट रितीने वागवल्याबद्दल महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढून त्याला कैदेत ठेवले.

महिलांना शिक्षा करावयाची नाही असा महाराजांचा नियम असल्यामुळे त्यांनी आपल्या समोर हजर केलेल्या मल्लाबाईंची मुक्तता करून सावित्री या नावाने गौरविले. शिवाय बेलवडी बरोबरच आणखी दोन गावे मल्लाबाईंच्या मुलाच्या दूधभातासाठी इनाम दिले. रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केल्याचा तसेच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन रवानगी केल्याचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहेच. त्याच पद्धतीने मल्लाबाई देसाई यांचा हा प्रसंग राजांच्या आदरभावाची जाणीव पुन्हा करुन देतो.

महाराजांच्या हयातीत असणारे एकमेव शिल्प मल्लाबाईने करुन घेतले. कर्नाटकातील यादवाडमध्ये ते आजही पहायला मिळते. मराठा साम्राज्याच्या संस्थापकाच्या दिलदार पणाचे व स्त्री विषयक आदरभावाचे साक्ष देणारे हे अनमोल शिल्प पुढच्या पिढीने जरूर पहायला हवे, असे ही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here