पणजीत (गोवा) – गोव्यात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. ५०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे १०० घरांचे मोठे आणि १०० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पणजीत१०८ मिली पावसाची नोंद झाली आहे. ४ नंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा वेग कायम आहे. हे वादळ पणजीपासून अवघ्या १००.६ किमी अंतरावरून गेले आहे. सगळीकडे वाऱ्याचा जोर कायम आहे, पावसाचा जोर ओसरत आहे पण काही काळाने पाऊस पुन्हा जोर धरील असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात झाडे, विजखांब कोसल्याच्या १५० हुन अधिक घटना आहे, पण प्रत्येक ठिकाणी पोहचण्यास अग्निशामक दलाला शक्य नसल्याने हतबलता आहे.
गोव्यात पावसाचा कहर
गोव्यातील पेडणे येथे ७५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. जुन्या गोव्यात ८८.५ मिली मीटर, म्हापसा १११.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौक्ते वादळ निर्माण होऊन ते किनारपट्टीवर धडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर आज हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टी भागावर धडकले असून, आज सकाळ पासूनच या वादळाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली होती.
पणजीत ६० ठिकाणी झाडे, घरे कोसळली, अग्निशामक दल हतबल
या चक्रीवादळाने राज्यात सगळीकडेच कहर मांडला आहे. एका पणजी शहरात आतापर्यंत ६० हुन अधिक ठिकाणी झाडे, घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ सुदैवाने, आतापर्यंत राज्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सायंकाळपासून राज्याला पावसाने तडाखा दिला आहे. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ६० हुन अधिक ठिकाणी घरांवर, वाहनांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी घरे, शासकीय आस्थापने यावरील छत वाऱ्याने उडून गेले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने दैनंदिन व्यवहार सकाळपासून ठप्प आहेत. कदंबा बसस्थानकाच्या इमारतीवरील पत्रेदेखील उडून गेल्याची घटना घडली आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी अश्या घटना घडत असल्याने अग्निशामक दल हतबल झाले आहे. तरीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.



