सिंधुदुर्ग – गोव्यात प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा केल्या नंतर गुरूवारी गोव्यात जाणाऱ्या नोकरदार वर्गाने महाराष्ट्र हद्दीत गोव्यात जाणारी व गोव्यातून येणारी वाहतूक रोखली. जर बंद करायचे असेल तर सर्व वाहतूक बंद करा आमच्या पोटावर का मारता, डंपर वाहतुक खुलेआम सुरु असल्याने युवक युवती आक्रमक झाले. सध्या दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाले होते.
गोव्यात कामासाठी जाणाऱ्या युवक-युवतींना तपासणी अहवालाची सक्ती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कामासाठी जाणाऱ्या युवक-युवतींना तपासणी अहवालाची सक्ती करत थांबविण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी आज येथील पत्रादेवी नाक्यावर वाहतूक रोखून धरली. दरम्यान यावेळी मायनिंग तसेच खडीची वाहतूक करणारे डंपर चालकांना थेट प्रवेश,मात्र आम्हाला दुसरा न्याय का?,असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी तेथे दाखल झालेल्या बांदा सरपंच अक्रम खान व पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ यांनी याबाबत आपण जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून उद्याच्या दिवसात योग्य ती भूमिका घेऊ,असे आश्वासन दिले.मात्र जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही,तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,असा इशारा त्याठिकाणी जमलेल्या युवकांनी दिला.
बांदा सरपंच आणि उपसभापतींनी केली मध्यस्ती
दरम्यान बांदा सरपंच अक्रम खान व पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ यांनी याबाबत आपण जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून चर्चा करतो. एक दिवसाची मुदत द्या, आम्ही जिल्हा प्रशासनाशी चर्चा करतो, असे सांगून त्या सर्वांना माघारी पाठवण्यात आले. या सर्व परिस्थितीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पोटासाठी गोव्यात जात असताना नाहक कायद्याचा बडगा दाखवून आम्हाला थांबवले हे चुकीचे आहे. कोराना तपासणी अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात मग दर ७२ तासांनी आम्ही तो अहवाल आणायचा कसा?, सवाल या युवकांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग प्रशासन या युवकांच्या बाबत नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.



