सिंधुदुर्ग – गोव्याच्या किनारपट्टीवर ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. गोव्यातील कोळंब काणकोण किनारपट्टीवर जोरदार लाटा धडकून येथील रस्ताही समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या लाटांचे पाणी येथील रहिवाशांच्या घरातही गेले आहे. सिंधुदुर्गातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासन सज्ज असल्याचे म्हटले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी उशिरा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफ आणि सुरक्षाविषयक अन्य एजन्सीची पथके गोव्यात तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाने या वादळाशी दोन हात करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. असे सांगितले. मच्छिमार बांधवानी समुद्रात जाऊ नये. असे सांगतानाच २४ तास जिल्हा आणि तालुका पातळीवर कंट्रोल रम कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले. वीज खाते, पोलीस खाते यांनाही अलर्ट करण्यात आले आहे. या वादळात पाऊस आणि जोरदार वारे वाहणार असल्याने सर्वानी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
गोव्यात वादळाचा प्रभाव सुरु
गोव्यातील समुद्रात पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. समुद्राला उधाण आले असून याचा फटका गोव्यातील कोळंब काणकोण किनारपट्टीला बसला आहे. शनिवारी समुद्राच्या रौद्र लाटांनी येथील लोकवस्तीत प्रवेश केला. इथल्या रस्त्याचेही लाटांच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणचा रस्ता वाहून गेला आहे. दरम्यान समुद्राचे हे पाणी या भागातील काहींच्या घरातही घुसले आहे.
सिंधुदुर्गातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ
सिंधुदुर्गातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मेघगर्जनेसह दाखल झालेल्या वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत मिटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, मांडवी खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबोली परिसरात सोसाट्याचा वारा व ढगांच्या गडगडाटासह आज मुसळधार पाऊस कोसळला. मालवण बंदरात बंदर विभागाच्यावतीने तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे.
गोवा व सिंधुदुर्गात कमी जास्त प्रमाणात पाऊस
दरम्यान गोव्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरु आहे. गोवा व सिंधुदुर्गच्या समुद्रातून रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत चक्रीवादळ पुढे सरकणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी किनारपट्टी भागाची केली पाहणी. गोवा व सिंधुदुर्ग किनारपट्टीपासून हे वादळ बरेच दूर असून आज रात्री किंवा उद्या या वादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात जाणवू शकतो, असे सांगण्यात येत आहे.



