गेट वे कडून मांडवा जेट्टीकडे येणारी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. सकाळी 10:30 च्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. अजंठा कंपनीची ही प्रवासी बोट होती. या बोटीत एकूण 88 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून ते सुखरूप आहोत. मांडवाचे पोलीस कर्मचारी प्रशांत घरत आणि सदगुरू कृपा बोटीच्या दोन खलाशांनी या बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचविले. त्यामुळे या बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचविणारे हे 3 जण त्यांच्यासाठी देवदूत ठरले आहेत.
गेटवे येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती. मांडवा बंदराजवळ बोट आली असता, अचानक बोटीत बिघाड होऊन पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना ही माहिती मिळताच त्यांनी सदगुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यांना तातडीने पाठवून दिले.
बोटीच्या खलाशांनी तातडीने जाऊन बुडणाऱ्या 88 जणांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले. बोट पोहोचण्यास थोडा जरी उशीर झाला असता, तर 88 जणांना जलसमाधी मिळाली असती. मात्र, बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक देवदूतासारखे पोहोचल्याने प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली.