गुन्ह्याचे गांभीर्य अन् सुधारणेची ओढ; पोक्सो अंतर्गत शिक्षा भोगणाऱ्या तरुणाची शिक्षा हायकोर्टाकडून कमी

0
3

मुंबई- मुंबईतील एका पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपीचे तत्कालीन तरुण वय, त्याचा दीर्घकालीन तुरुंगवास आणि कारागृहात असताना त्याने स्वतःमध्ये केलेले सकारात्मक बदल लक्षात घेऊन, न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने त्याची जन्मठेपेची शिक्षा आता १२ वर्षांपर्यंत कमी केली आहे.

 

विशेष म्हणजे, आरोपीने तुरुंगात असताना महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित निबंध स्पर्धेत घेतलेला सहभाग आणि इतर शैक्षणिक उपक्रमांमधील त्याची प्रगती न्यायालयाने शिक्षे सवलत देताना महत्त्वपूर्ण मानली आहे.

हे प्रकरण ९ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईत घडले होते, जेव्हा पाच वर्षांची पीडिता शेजाऱ्यांकडे पाणी आणण्यासाठी गेली असता २० वर्षीय आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेने या घटनेची माहिती तात्काळ पालकांना दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. विशेष पोक्सो न्यायालयाने या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, ज्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खटल्यादरम्यान आता आठ वर्षांच्या झालेल्या पीडितेने आरोपीला ओळखले असून, तिची साक्ष अत्यंत विश्वासार्ह आणि सुसंगत असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट करत गुन्ह्यातील दोषीत्व कायम ठेवले.

मात्र, शिक्षा कमी करताना न्यायालयाने आरोपीच्या सुधारणावादी भूमिकेवर भर दिला. गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे वय केवळ २० वर्षे होते आणि त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. डिसेंबर २०१६ पासून तो सलग कोठडीत आहे. या काळात त्याने तुरुंगात राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि गांधीवादी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला, ज्याची प्रशस्तिपत्रके कोर्टासमोर सादर करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य असले तरी, तरुणाच्या सुधारणेची शक्यता आणि त्याने आधीच भोगलेला कारावास पाहता १२ वर्षांची शिक्षा न्यायाच्या उद्देशाने पुरेशी ठरेल, असे मत खंडपीठाने आपल्या आदेशात व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here