कोकण – पेणमधील नाक्यावर दुकानासमोर गाडी लावण्याच्या वादातून झालेल्या किरकोळ भांडणात एकाच मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर आदिवासी वाडीवरील संतप्त जमावाने दुकानाची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील वातावरण काही काळ तंग झाले होते.
याबाबत माहिती अशी की, रोहन संतोष पवार (वय 26, रा. कामार्ली आदिवासीवाडी) हा गुरुवारी दुपारी केटीएम बाईक नाक्यावरील नारळाच्या दुकानासमोर लावीत असताना दुकानदार बांदिवडेकर याने त्याला हटकले व दुकानासमोर गाडी लावू नको असे सांगितले. यातून दोघांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन रोहन पवार हा रस्त्यावर पडला. त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. थोड्या वेळाने मृत रोहन पवारचे नातेवाईक व गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने दवाखान्याजवळ गर्दी केली. काही नागरिकांनी पोलीस स्थानकात धाव घेत आरोपीला अटक करून शिक्षा करण्याची मागणी केली. आदिवासीवाडीवरील संतप्त जमावाने बांदिवडेकर यांच्या दुकानाचीही तोडफोड केली. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले.
सायंकाळपर्यंत मृतांचा शवविच्छेदन करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पेण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे करीत आहेत. शांतात व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.