सिंधुदुर्ग – परराज्यात जाणा-या कामगारांसाठी मोफत रेल्वेगाड्या सोडणा-या सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठीही विशेष रेल्वेगाडी सोडण्याची मागणी मुंबई, ठाण्यातील कोकण प्रवासी संघटनांनी करत व्हॉट्सअॅप मोहीम सुरू केली आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान करून, नाव, पत्ता इत्यादी माहिती व्हॉट्सअॅपवर पाठवण्याचे आवाहन संघटनांनी के ले आहे. ही सर्व माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका आठवड्यानंतर पाठवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणा-यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अद्याप कोकणासाठी एसटी किंवा रेल्वे सोडण्याबाबत आणि त्याच्या नियोजनाविषयी काहीच माहिती शासनाने दिलेली नाही. कोकणातील काही गावांतील ग्रामपंचायतींकडून गणेशोत्सवानिमित्त गावात आल्यास १४ दिवस अलगीकरणात राहण्याचा नियम चाकरमान्यांसाठी आखण्यात आला आहे. त्यामुळे आणखीनच पंचाईत झाली आहे. एसटी सोडल्यास त्या प्रासंगिक करारावर चौपट भाडे आकारून नको, तर मूळ भाडे आकारून एसटी सोडण्याची मागणी आहे.
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी मुंबई, ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय राहात असल्याचे सांगितले. खासगी वाहनांचे दर अवाच्या सवा असल्याचे टाळेबंदीतही दिसून आले. गणेशोत्सवातही तेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात झटपट व स्वस्त प्रवासासाठी रेल्वे हाच पर्याय असून विशेष गाडी सोडण्याची मागणी शासनाकडे करत आहे. यासाठी व्हॉट्सअॅपमार्फत विशेष मोहीम सुरू केली असून सर्व प्रवासी संघटना यात सामील आहेत.
काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले छायाचित्र, पूर्ण नाव, सध्या राहण्याचे ठिकाण, तालुका लिहून संघटनेच्या ७०२१९१६१५१ किंवा ०८९७६०२०७९३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केल्याचे कांबळे म्हणाले. वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जड्यार यांनी आठवडाभर ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले.



