महाराष्ट्र राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचारामुळे राज्य हादरले असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. राजेश सुरेश कांबळी (३०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणी गडचिरोली येथे उपचार घेत असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच देसाईगंजमध्ये हा प्रकार घडला आहे. पीडित युवती ही देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात शिकाऊ परिचारिका म्हणून कार्यरत आहे. दुपार पाळीतील काम आटोपून ती रात्री साडेसात-आठ वाजताच्या सुमारास बसने आपल्या गावी जात असे. रविवार ८ तारखेला काम आटोपल्यानंतर ती देसाईगंज येथील बसस्थानकावर पोहचली. परंतु बराच वेळ वाट बघूनही बस आली नाही. एवढ्यात तेथे तिची ओळख असलेला राजेश कांबळी हा युवक मोटारसायकलवर आला. रात्र झाल्याने गावी जायचे कसे, म्हणून तिने राजेशला लिफ्ट देण्याची िवनंती केली.
वाटेत राजेशने तिला शिवराजपूर फाट्यावरील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला व नंतर गळा दाबून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाला, असे समजून राजेश तिचा मोबाईल व अन्य सामान घेऊन पसार झाला. दरम्यान, गावाकडे येणारी बस व अन्य वाहने येऊन गेली व त्यातून कामावर जाणारे अनेक जण गावात आले. परंतु मुलगी घरी आली म्हणून कुटुंबीयांनी पीडितेच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, पंधरा-वीस वेळा प्रयत्न करुनही मुलीने मोबाईलला प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी आपल्या मुलासह मोटारसायकलने देसाईगंज गाठले. तेथे ती काम करीत असलेल्या रुग्णालयातही विचारपूस केली. परंतु ती बऱ्याच वेळापूर्वी रुग्णालयातून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वडिलांनी शहरात इतरत्र शोध घेतला. मात्र,तिचा पत्ता लागला नाही.
इकडे पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर कशीबशी शेजारच्या राईसमिलमध्ये गेली. तेथे उपस्थित इसमांना तिने आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहचवली. त्यानंतर वडील व भाऊ यांनी राईसमिलमध्ये येऊन तिला घरी नेले. रात्री साडेअकरा वाजता देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून आरोपी राजेश कांबळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पहाटेला पीडित मुलीला गडचिरोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. तिची प्रकृती उत्तम आहे.