मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकड़े जात असलेल्या टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो समोरून जाणाऱ्या कारला जाऊन धडकला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोघे जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक 4 वर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत असून दिवसागणिक एक अपघात होत आहे. आज झालेल्या अपघातातील टेम्पोचे अमृतांजन पुलाखालून मुंबईच्या दिशेने बोराघाट उतरताना ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने वळणावर तो पलटी झाला. त्यानंतर टेम्पोच्या पुढे जात असलेली एक कार त्या टेम्पोखाली दाबली गेली. त्या कारमधील दोन्ही प्रवासी जखमी झाले असून यात जीवितहानी मात्र टळली आहे.घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यावर ट्राफिक खुले करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.