कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठी ३,२४४ कोटींची तरतूद; मंत्री नितेश राणेंनी मांडला लेखाजोखा

0
26

कणकवली: केंद्रीय अर्थसंकल्पातून कोकणच्या पदरात विकासाचे मोठे दान पडले असून, प्रलंबित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासह मच्छीमार आणि बागायतदारांसाठी केंद्र सरकारने तिजोरी खुली केली आहे. “या भरीव तरतुदींमुळे कोकणच्या अर्थकारणाला नवी गती मिळेल,” असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रेल्वे मार्गासाठी ३,२४४ कोटी; ९ फेब्रुवारीपासून भूसंपादन

पालकमंत्री राणे यांनी माहिती दिली की, एकूण ६,५०० कोटींच्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार आहे. यातील ३,२४४ कोटींची तरतूद झाली असून, ९ फेब्रुवारीपासून भूसंपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होणार आहे. २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र व्यापार-दळणवळणाच्या नव्या सूत्रात जोडले जातील.

मच्छीमार आणि बागायतदारांची ‘चांदी’

कोकणच्या किनारपट्टीचा विचार करता, खोल समुद्रातील मासेमारी पूर्णपणे ‘करमुक्त’ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ५०० नवीन तलावांची निर्मिती मच्छीमारांचे आर्थिक सक्षमीकरण करेल. बागायतदारांसाठी ‘नारळ संवर्धन योजने’च्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

पर्यटनाला ‘सी-प्लेन’चे पंख

पर्यटन क्षेत्रासाठी विशेष जलवाहतूक आणि ‘सी-प्लेन’ निर्मितीसाठीही अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. “माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे सर्व प्रकल्प आज वास्तवात येत आहेत,” असेही नितेश राणे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here