मुंबई – पनवेल ते कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या महिनाभराच्या रात्रकालीन ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्यांवरही होणार आहे. या मार्गावरून धावणाऱ्या तुतारी, मांडवी, कोकणकन्या आणि मत्स्यगंधा या प्रमुख एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांना प्रवासात विलंबाचा सामना करावा लागणार आहे.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DDFC) प्रकल्पाअंतर्गत पनवेल–कळंबोली दरम्यान ओपन वेब गर्डर उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार असून, लोकल सेवांवर मर्यादित परिणाम होईल. मात्र, मेल-एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार असून त्यात कोकण रेल्वेच्या गाड्यांचा समावेश आहे.
या कालावधीत एकूण सहा वेळा ब्लॉक प्रस्तावित असून, कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत, तर काही एक्सप्रेस ठराविक ठिकाणी थांबवण्यात येणार असल्याने वेळापत्रकात बदल होईल.
मुंबईकडे येणाऱ्या कोकणकन्या, तुतारी आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस विविध स्थानकांवर थांबवण्यात येणार असून, CSMTवरून संध्याकाळी 7.10 वाजता सुटणारी मांडवी एक्सप्रेस आता सुमारे तासभर उशिरा सुटणार आहे. त्यामुळे मडगावला पोहोचण्याची वेळही बदलणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



