कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी ५१५ कोटींचा निधी; दुपदरीकरण आणि ‘कवच’ प्रणालीमुळे प्रवास होणार वेगवान व सुरक्षित

0
4

मुंबई: कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ५१५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली आहे. या भरीव निधीमुळे कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार असून किनारपट्टी भागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. महाराष्ट्रात सध्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी एकूण २३ हजार ९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यात सध्या सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.

कोकण रेल्वे ही केवळ एक वाहतूक मार्ग नसून ती संपूर्ण किनारपट्टीची जीवनवाहिनी आहे. वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता या मार्गाची क्षमता वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता पूर्ण झाला असून तो सध्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. हे दुहेरीकरण टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर धावणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणे शक्य होणार आहे.

कोकण रेल्वेचा मार्ग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असल्याने या नव्या निधीचा विनियोग प्रामुख्याने बोगद्यांचे मजबुतीकरण आणि रेल्वे रुळांचे अद्यावतीकरण करण्यासाठी केला जाणार आहे. जुन्या तंत्रज्ञानात सुधारणा करून हा मार्ग अधिक सक्षम करण्यावर रेल्वे मंत्र्यांनी भर दिला आहे. यामुळे केवळ रेल्वेची क्षमताच वाढणार नाही, तर या भागातील व्यापार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

विस्तारासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने ‘कवच’ या स्वदेशी सुरक्षा प्रणालीला मंजुरी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर ही अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे रेल्वे अपघात रोखण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा प्रवास पूर्णपणे निर्धोक होईल. यासोबतच मुंबई-गोवा या कोकण मार्गाच्या दुहेरीकरणालाही हिरवा कंदील मिळाल्याने भविष्यात कोकणचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here