पणजी: गोवा कोकणी अकादमीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी आणि ताबडतोब नवीन अध्यक्ष नेमावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप सरकार कोकणी लेखकांची फसवणूक करत असून नवोदित लेखकांना योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप केला.
विल्मा फेर्नांडीस, केनिशा मिनेझीस व महेश नादार यावेळी उपस्थित होते.
“कोकणी भाषेच्या प्रगतीसाठी आणि तिच्या विकासासाठी काँग्रेसचे खूप योगदान आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने आमची मातृभाषा कोकणी भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आपल्याला घटकराज्याचा दर्जाही मिळाला. पण आता कोकणी अकादमीवर सुरू असलेले राजकारण पाहून दुःख होत आहे,” असे पणजीकर म्हणाले.
“राज्याच्या सर्व इच्छूक वाचकांपर्यंत कोकणी साहित्य पोहोचेल पाहिजे याची आम्ही काळजी घेतली आणि म्हणूनच माजी खासदार स्वर्गीय शांताराम नाईक यांनी मोबाईल व्हॅन लायब्ररी कोकणी अकादमीला दान केली. पण हे सरकार ते वाचनालय सांभाळण्यात आणि गोव्याच्या कानाकोपऱ्यात हे वाचनालय नेण्यात अपयशी ठरले,’ अशी खंत पणजीकर यांनी व्यक्त केली.
गोवा कोकणी अकादमी पाटो येथील शासकीय वसाहतीतून गोवा संचार भवन इमारतीत स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, अकादेमीला कायमस्वरूपी जागा देऊन हे प्रकार थांबवले पाहिजे. “साहित्यिक कार्य आणि धोरणे गोवा कोंकणी अकादमीद्वारे हाताळली जाते, म्हणून अकादमीला कामाच्या चांगल्या वातावरणासह चांगली जागा आवश्यक आहे. जर सरकारने कार्यालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत राहिल्यास त्याचा प्रगतीवर परिणाम होईल,” असे ते म्हणाले.
‘सध्याची जागा कायमची आहे की तात्पुरती आहे हे सरकारने स्पष्ट करावे,’’ अशी मागणी त्यांनी केली.
“भाजप सरकारने कोकणी भाषेच्या उन्नतीसाठी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि कोकणी भवन बांधून त्याच इमारतीत अकादमीला स्थान द्यावे असे मी आवाहन करतो. यामुळे प्रत्येक कोकणी व्यक्ती आणि लेखकांना योजनांचा लाभ घेता येईल आणि साहित्यिक कार्याला चालना मिळेल,” असे ते म्हणाले.
अकादेमीचे अध्यक्षपदी अरुण साखरदांडे यांचा कार्यकाळ जानेवारीत संपला असला तरी नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल पणजीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.
“आमच्या सूत्रांनुसार, त्यांचा कार्यकाळ संपला आहे आणि म्हणून सरकारने कोकणी भाषेच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्यक आहे. जोपर्यंत नवीन अध्यक्षाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत नवीन समिती आणि योजना कशा सुरू होतील,” असा सवाल त्यांनी केला.
भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने कधीच पूर्ण होत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारायचे आहे की ते या सर्वोच्च पदासाठी आरएसएस मधून कोणालातरी नियुक्त करण्यासाठी तयारेत आहेत का,’’
“भाजप सरकार लेखक/जनतेचा आवाज दाबत आहे हे स्पष्ट झाले आहे आणि म्हणून आम्हाला या विषयावर बोलावे लागत आहे. कोकणी अकादेमीला कायमस्वरूपी जागा आणि नवीन अध्यक्ष मिळेपर्यंत आम्ही हा मुद्दा उपस्थित करत राहू,” असे पणजीकर म्हणाले.
ते म्हणाले, कोकणी अकादमीने साहित्य पुरस्कार देणे पुन्हा सुरू केले पाहिजे.
“लेखकांच्या योगदानाचा गौरव झाला नाही तर त्यांना प्रोत्साहन कसे मिळेल. पुरस्कारांच्या बाबतीत लक्ष घालणे आणि ते पुन्हा सुरू करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.” असे पणजीकर म्हणाले.