मुंबई विद्यापीठाचे विभाजन होऊन कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सचिव पातळीवर समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई विद्यापीठाशी ८२६ महाविद्यालये संलग्न असून एवढ्या महाविद्यालयांमुळे प्रशासनावर ताण पडत असल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. कोकणातील महाविद्यालयांना अनेकदा कामांसाठी मुंबई गाठणे जिकरीचे होते. त्यातून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची करण्यात येत होती. कोकण विद्यापीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांसाठी कोकणात स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी मागणी याआधीदेखील करण्यात आली होती. सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत अनुकूलता दाखवले असल्याचे समजते. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामुळे कोकणचे शैक्षणिक प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन कोकण विद्यापीठ कृती समितीचे रमेश कीर यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत कोकण विद्यापीठाचा प्रश्न लवकर सुटावा याकरीता आग्रह धरण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकण विद्यापीठासाठी जमीन व निधीची अडचण येणार नाही असं आश्वासन उदय सामंत यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.



