कोकणात वादळी पावसाचा गंभीर इशारा, 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणार वारे
सिंधुदुर्ग – समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्राकार स्थिती सक्रिया झाल्याने आणि कमी दाबाचा प्रभावी पट्टा सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यात मळभी स्थिती तयार होऊन अवकाळीचे ढग जमा होतील आणि त्यामुळे ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणार्या वार्याने किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी पाऊस शक्य असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
ही स्थिती आगामी दोन दिवस राहणार आहे. या कालावधीत तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. कोकण किनारपट्टी भागात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर मळभी आच्छादन कायम होते तर मंगळवारी रात्री तापमानात उतार झाला होता. रत्नागिरीत गेले दोन दिवस पारा चढलेला होता. तो दोन अंशाने बुधवारी खाली आला बुधवारी सकाळी किमान तामपान 30 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले. वातावरणीय स्थिती अशी दोन दिवस कायम रहाणार आहे. या कालावधित किनारी भागात वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारी गावांना तसेच दुर्गम भागातील वाडी-वस्त्यांनाही सावधगिरी आणि सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.