कोकणात आदिवासी, कातकरी समाज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयामध्ये वास्तव्य करून आहे. ठाणे, रायगड येथे हा समाज मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो. या समाजाची जीवनशैली अजूनही निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. काही लोक त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रत्न करत आहेत मात्र त्यांना पुरेशी साथ मिळत नाही. तर उर्वरित समाज त्यांना अजूनही स्वीकारायला फारसा तयार असल्याचे दिसत नाही परिणामी हा समाज स्वातंत्र्याची कित्येक दशके उलटूनही भटक्याच आहे.
आदिवासी, कातकरी लोक हे सहसा रानावनाच्या जवळ किंवा एखाद्या लहान पाणसाठ्याच्या कडेला राहतात. सहसा एखादे लहानसे गाव आठ दहा किलोमीटरवर असते. त्यांना वर्षातून तीन महिने वीटभट्टीवर रोजगार मिळू शकतो. बाकीचा काळ ते लाकुडफाटा जमवणे, बकर्यांसाठी हिरवा पाला तोडून आणणे, मासे पकडणे असे प्रकार करत असतात. शासनाने आता त्यांना शिक्षण मोफत ठेवलेले आहे. वह्या-पुस्तकेही मोफत आहेत. एक गणवेष मोफत आहे. मात्र एवढे सगळे असूनही कातकरी लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवतातच असे नाही. आदिवासी मुले शाळेतून घरी आली की त्यांना बकर्या घेऊन चरायला जा, डोक्यावर पाण्याचे हंडे धरून लांबून पाणी भरून आण अशी कामे सांगितली जातात. त्यामुळे मुलांनाही घरी अभ्यासाशी घेणेदेणे उरत नाही. अनेकदा शाळा चुकवली जाते. ह्या मुलांच्या पालकांना अजून हेच ज्ञात नाही की त्यांची मुले शिकली तर समाजाच्या विकासाला चालना मिळेल.
हे लोक आरोग्याबाबतीत अतिशय सुदैवी असतात. त्यांना झाडाफुलांमधून आणि डोंगरांना कुरवाळून येणारी अतीशुद्ध हवा चोवीस तास मिळते. दुसरे म्हणजे पाणी ! कातळावरून वाहणारे नितळ शुद्ध पाणी त्यांना उपलब्ध असते. पावसाळ्यानंतर जलाशयातील पाणी आणल्यावर ते त्या पाण्याला अनेकदा गरम करून शुद्ध करतात. चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करताना, शेळ्यांसाठी हिरवा पाला आणताना, पाणी वाहून आणताना आणि रानातून मिळणारे विविध खाद्यपदार्थ आणताला त्यांची अविरत पायपीट चाललेली असते. ढोरवाटा, टेकड्या, घाट अश्या भागातून ते सतत चाललेले असतात, तेही अनेकदा वजन उचलून, त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय काटक असते. दिसायला ते फार क्षीण आणि हडकलेले दिसतील, पण प्रचंड चिवट असतात.
महत्वाचे म्हणजे आहार, आपल्या आणि त्यांच्या आहारात जमीन-अस्मानाचा फरक असतो. ते लोक बर्याच प्रमाणात कंदमुळे खातात. तसेच, आपल्याला शहरात सहसा मिळत नाहीत अश्या पालेभाज्यांचेही त्यांना ज्ञान असते. ते त्या पालेभाज्या खातात. नित्याचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे आणि एखादी हिरवी पालेभाजी, मांसाहार, ज्याला ते ‘वशाट’ म्हणतात, तो म्हणजे जलाशयातून मासे किंवा इतर काही पकडणे, हा प्रकार त्यांच्यातील काहीजण नित्य करत असतात. नाही म्हणायला त्यांना सर्दी, खोकला, ताप व सर्पदंश हे प्रकार होत राहतात, पण त्यांचे प्रमाण व तीव्रता कमीच असते. ह्या सर्व घटकांशिवाय आपल्या जगात असलेली स्पर्धा आणि ताण त्यांच्या जगात जवळपास नसल्याने त्यांचे मानसिक आरोग्यही खणखणीत राहते व पर्यायाने त्याचाही चांगलाच परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळेच हे लोक आपल्याच धुंदीत रानावनात फिरत राहतात.
एका वस्तीत चाळीसएक घरे असतात. ही घरे मातीची असतात व वर झावळ्या असतात. ह्या घरांचा आकार किती असावा हे ज्याचे तो ठरवतो. घराला कसलेही संरक्षण नसते कारण संरक्षण करायचे कशाचे हाच प्रश्न असतो. घरामध्ये चकचकीत दिसणारी भांडी असतात. एका दोरीवर धुतलेले, न धुतलेले असे सगळेच कपडे टांगलेले असतात. कपाट वगैरे प्रकार सहसा ठेवत नाहीत. चुलीवर स्वयंपाक केला जातो. आंघोळीसाठी घराबाहेर एक लाकडी काठ्या उभारून, त्यावर तीन बाजूंनी फडकी टाकून उभी केलेली बाथरूम असते. एखादा लहानसा जलाशय जवळच असतो. सहसा एकापेक्षा अधिक लग्न करत नाहीत. मात्र एखाद्याची पत्नी दगावली आणि त्याला लहान मुले असली तर वस्तीच्या एकमतानुसार त्याचे कोणाशीतरी लगेच लग्न लावून देण्यात येते व ती नवीन नवरी त्या मुलांचे संगोपन करू लागते. वस्तीला एक म्होरक्या असतो. तो बाहेरच्या जगाशी संबंध ठेवण्यास अधिकृत माणूस गणला जातो. एका कुटुंबात सहा ते सात सदस्य असतात. सहसा दोन ते तीन मुलांनंतर मुले होऊ देत नाहीत. लग्न मात्र फार लवकर लावून देण्यात येते. हे लोक सर्व सण साजरे करतात. मात्र होळी ह्या सनाला सर्वाधिक महत्व असते असे म्हणतात.
सततच्या मेहनतीमुळे रंग रापलेला असतो. शरीराच्या शिरा दिसत असतात. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे चेहर्यावर सतत गोंधळल्यासारखे, बावळट भाव असतात. रानातूनच ते त्यांची औषधेही प्राप्त करतात. लहानसहान इन्फेक्शन्स, त्वचारोग, जखमा ह्यावर त्यांच्याकडे जालीम रानटी औषधे असतात. मात्र अशिक्षित असणे, अस्वच्छ असणे, पैसा नसणे, आराम नसणे ह्या कारणांनी ह्या लोकांचे सौंदर्य बाधीत होते. अंगावर सहसा चरबी अगदीच कमी असते. स्त्रिया काळ्यासावळ्या असल्या तरीही त्वचा सहसा तुकतुकीत असते. अगदीच बारीक अश्या अनेक स्त्रिया असतात. पैसे नसल्यामुळे कपडे किंवा दागिने ह्यांचा प्रश्न येत नाही. तसेच, जीवनशैली वेगळी असल्याने मेक-अपचाही प्रश्न येऊ शकत नाही. नाही म्हणायला आता काही स्त्रिया गाऊन घालून हिंडतात ही काही ती थोडीशी अधुनिकता, मात्र ह्या स्त्रियांच्या देहबोलीत मोठे सौंदर्य लपलेले असते. खणखणीत आवाज, ताडताड चालणे, पातळ पार मांड्यांच्यावर घेऊन खोचलेले, एका हातात कोयता किंवा डोक्यावर मोळी अश्या अवतारात रानोमाळ अती आत्मविश्वासाने हिंडणार्या ह्या स्त्रिया ठिणग्यांसारख्या वावरत असतात. आपल्या वस्तीत पुरुषांवर सर्रास डाफरणार्या ह्या स्त्रिया वस्तीबाहेरच्या माणसांसमोर मात्र एकदम कावर्याबावर्या होतात.
हे लोक स्वच्छ मात्र राहात नाहीत. ह्या लोकांची अस्वच्छता हा एक असा निकष आहे की ज्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात एक मोठी दरी पडते. शासनाने ह्या कातकरी लोकांना संधी देऊ केलेल्या आहेत. शिक्षण मोफत आहे. नोकरीसाठी आरक्षण आहे. उदरनिर्वाहासाठी लहानमोठे व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. एकाच ठिकाणी राहणार्यांपैकी काहींना शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरेही बांधून दिली आहेत. मात्र शिकून सवरून प्रगती करायची दिशा त्यांना दाखवणारे हात फार कमी आहेत.