कोकणातील होळी उत्सवात विजयदुर्गच्या गाबीत शिमगोत्सला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या उत्सवादरम्यान मौखिक परंपरेतून आलेले फाग गायले जातात. फाग हा शिग्माखेळ नाट्यातील महत्वाचा भाग आहे. त्याची रचना ओवीसारखी असते परंतु हा गीतप्रकार म्हणजे ओवी नव्हे.
फाग १
विजयदुर्ग नऽगऽरी होऽऽ विजयदुर्ग नऽगऽरी
की डंका गर्जेऽ चौबदऽरीऽऽ होऽऽ
किल्ला बांऽधऽलाऽ संबूर होऽ नेस्तावरीऽऽ
आणि होऽ वेताळ हाऽय वरीऽऽ किल्याचा दरीवजा भुतूऽर होऽ
आणि रेऽ रामलिंग महाराऽज होऽऽ
रामलिंग महाराऽजऽ देऊळ बांऽधलेऽ खोरीऽतऽऽ
देऊळ बांऽधलेऽ खोरीऽत की आंगराऽ आहे त्याच्या बाजूऽसऽऽ
(शब्द अर्थ – १ संबूर- समोर , २ नेस्तावरी – जमिनीचे समुद्रात घुसलेले टोक, ३ भुतूर – आतमध्ये )
फाग २
प्रथऽम दसऱ्याचेऽ दिवऽशीऽ होऽऽ इंग्रज आले होऽ बाऱ्यावऽरऽ होऽऽ
नांगर टाकून होऽऽ नांगर टाकून गाऽऽ
टाकून हवल्यावऽरऽ माऽऽर देतो किल्यावऽरऽऽ
सुमराण करूऽन होऽऽ सुमराण करूऽन गाऽऽ
करूऽन रामेशाऽचेऽ सेने गोळे माऽरी तोऽऽ
गोळा पडलाऽ होऽऽ गोळा पडला गाऽऽ
पडलाऽ तरांड्यावरीऽ तरांडा जाळायास लागऽलाऽऽ
नांगर कापून होऽऽ नांगर कापून गाऽऽ
कापून वरच्यावरीऽऽ इंग्रज पळायास लागला होऽऽ
इंग्रज गेलाऽ होऽऽ गेला इलायत्या नगराऽलाऽऽ
गेलाऽ इलायत्या नगराऽ हिल्लार घालून मारावा त्यालाऽऽ
(शब्द अर्थ – १ बाऱ्यावर – मोहिमेवर, २ हवल्यावर- विजयदुर्ग किल्याच्या बाजूच्या एका ठिकाणाचे नाव, ३ तरांड्यावरी- लढाऊ जहाजांचा जत्ता )
संकलन – विवेक ताम्हणकर, कणकवली, सिंधुदुर्ग



