सिंधुदुर्ग – दुर्दैवाने महागाई वाढली असून गणेशाच्या सजावटीच्या सामानावरहि जिएसटी कर लावण्यात आला आहे. महागाईला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे असा आरोप शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे स्वार्थासाठी चाललेले सरकार आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा मिजास कधी मिरवला नाही मात्र कोरोनामुळे त्यांना काम करता आले नाही असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून समस्त गणेशभक्तांना केंद्र सरकारने लावलेल्या जाचक जिएसटी कराच्या बंधनातून मुक्ती मिळू दे असे म्हणत खासदार राऊत यांनी सर्व गणेशभक्तांना गणेशचतुर्थी च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील सरकार हे स्वार्थासाठी
महाराष्ट्रातील सरकारला जनतेचे काहीही पडलेले नाही. हे सरकार स्वार्थापोटी निर्माण झालेले सरकार आहे. जनतेच्या हिताचे त्यांना काही देणे घेणे नाही. आज अतिवृष्टीने मराठवाडा, विदर्भ उध्वस्त झालेला आहे, परंतु आजही शेतकऱ्यांचे, बागायतदारांचे पंचनामे झालेले नाहीत. मंत्री स्वतःच्या मिजाशी मध्ये मिरवताहेत असेही विनायक राऊत म्हणाले.
ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा मिजास मिरवला नाही
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा मिजास कधी मिरवला नाही. अत्यंत निरागस वृत्तीने आणि जनतेच्या हितासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते त्यांनी केले. मात्र दुर्दैवाने त्या वेळेला कोरोनाची महामारी आली त्यामुळे काम करायला जेवढा वेळ मिळायला हवा होता तो मिळाला नाही. असेही विनायक राऊत यांनी सांगितले.



