कुणकेश्वर यात्रेची तयारी युद्धपातळीवर; १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान भरणार यात्रा

0
3

सिंधुदुर्ग- दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा यंदा १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्टची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, भाविकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिली.

यावेळी सचिव हेमंत वातकर, कोषाध्यक्ष उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड, संजय वाळके, मंगेश पेडणेकर, दीपक घाडी आदी उपस्थित होते.

गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर आणि यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यात आले आहे. यामध्ये विशेष ‘जम्बो’ कॅमेऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे विशेष भरारी पथक तैनात असेल. समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा दल सज्ज असणार आहे. देवगड महाविद्यालयाचे १०० प्रशिक्षित विद्यार्थी प्रशासनाला मदत करतील.

यावर्षी १७ फेब्रुवारी रोजी दर्श अमावस्या असल्याने भाविकांना तीर्थस्नानासाठी आणि देवभेटीसाठी पूर्ण दिवस लाभ मिळणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी समुद्रकिनाऱ्यावर कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि अखंडित विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.

मिठमुंबरी-तारामुंबरी पूल या मार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे. एमटीडीसी परिसरातील मोकळ्या जागेचे सपाटीकरण अद्याप न झाल्याने यात्रेत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्त्वाचे नियम आणि सुविधा:

* प्लास्टिक बंदी: यात्रा परिसरात पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
* राजकीय बॅनर्सना मनाई: सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्यांवर राजकीय बॅनर्सच्या कमानी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे.
* थेट प्रक्षेपण: जे भाविक प्रत्यक्ष येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी यात्रेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
* प्रसाद: भाविकांसाठी देवस्थानतर्फे उच्च दर्जाचे ‘गुळ-बुंदी लाडू’ प्रसाद म्हणून उपलब्ध असतील.

भाविकांना आवाहन:

“यावर्षी पाच देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून, पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी शक्यतो दिवसा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि गर्दीच्या वेळी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here