सिंधुदुर्ग – जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे.
परिणामी खाणीतील पाणी व चिखली युक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.
कळणे मायनिंग परिसरात मातीचा काही भाग खचल्यामुळे याठिकाणच्या ८ ते १० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.यात एका घराची भिंत कोसळली आहे. तर रस्त्यावर चिखल पसरला आहे.
दरम्यान परिसरात आलेले पाणी तूर्तास उतरले असले तरी भीती मात्र कायम आहे.याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत नेमका हा प्रकार कसा घडला याचा शोध सुरू केला आहे.
यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान लोकांना त्रास होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना त्यांना देण्यात येणार असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सद्यस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या पाण्याचा प्रवाह आता ओसरला आहे, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.