कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टील मार्केट परिसरातील हाटेल देवांशी येथे असणाऱ्या द लीफ स्पा येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांना मिळताच त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ – २ चे उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे, विश्वासराव बाबर आदींसह १० कर्मचारी मिळून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास या स्पा वर धाड टाकून ७ जणांना ताब्यात घेतले. यावेळी तक्रारदार याला गिऱ्हाईक बनवून हा सापळा रचण्यात आला होता. याठिकाणी रोख रकमेसह निरोधची पाकिटेही मिळून आली.
संपूर्ण देशभरात आत्तापर्यंत गुरुग्राम, दिल्ली, आग्रा, मुंबई आदी ठिकाणच्या महत्वाच्या शहरांमध्ये यापूर्वी स्पा च्या नावाखाली रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहेत. नवी मुंबई आणि पनवेल परिसराचा वाढती लोकसंख्या पाहता याठिकाणीही स्पाच्या माध्यमातून विविध आकर्षक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये पूर्ण शरीराची मसाज, ऑइल, क्रीम आणि जेल तसेच पूर्ण मसाज झाल्यानंतर एक्सट्रा सर्व्हिससाठी त्या त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाशी चर्चा करू शकता अशा प्रकारचे प्रसिद्धी पत्रक सोशल मीडियाद्वारे स्पा चालक प्रसिद्ध करीत आहेत. यामध्ये पूर्ण शरीराची मसाज असो अथवा त्यासाठी लागणारे सामान याबाबत जाहिरात सुरु असल्यामुळे राजे प्रतिष्ठानच्या पनवेल विभागामार्फत पनवेलसह नवी मुंबईमधील स्पा सेंटरमध्ये देहव्यापाराबाबतची भीती निर्माण झाली असल्याचे पत्र जून महिन्यात नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांना देण्यात आले होते. त्यामुळे काही प्रमाणात कारवाईला सुरुवात झाली असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.
यावेळी धाड टाकण्यात आलेले ठिकाण हे कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असतानाही याठिकाणी अन्य पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागत असल्यामुळे याठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्याचे काही हित संबंध तर नाही ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंगळवारी सदर स्पा वर धाड टाकल्यानंतर याठिकाणी स्पा चालक लिओनाडो प्रसाद (३५), स्पा मॅनेजर आखिल रवी (२६) आणि हाऊस किपींग राकेश पुत्तन (२३) यांना पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर याठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ४ महिलांना न्यायालयाने देवनार येथील नवजीवन महिला सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे करीत आहेत.
(सौजन्य: www.sahajshikshan.com )