सिंधुदुर्ग – कणकवली शहराचा नवा डीपी प्लॅन लवकरच तयार होणार आहे. त्याअनुषंगाने ६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण शहराच्या ड्रोन सर्वेला प्रारंभ होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज येथे दिली.
पोलिस विभागाची परवानगी घेऊनच ड्रोन सर्वे केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी केले.
येथील नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, गटनेते संजय कामतेकर उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले, नगररचना उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून शहराचा सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे. तर शहरात अस्तित्वात असलेली घरे, रस्ते, पायवाटा, विविध झोन याची माहिती ड्रोनच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
ड्रोनचे सर्वेक्षण टंडन अर्बन सोल्यूशन या कंपनीकडे आहे. या कंपनीने शहरात विविध ठिकाणी आपले टॉवर कार्यान्वित केले असून ६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान ड्रोन द्वारे सर्वेक्षणाला सुरवात होणार आहे.
नगराध्यक्ष श्री.नलावडे म्हणाले, अचानक घराघरांवर ड्रोन फिरू लागल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या डीपी प्लानच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण होत असून नागरिकांनी घाबरू नये.
तसेच चुकीचे काही आढळल्यास नगरपंचायतीशी संपर्क साधावा. शहराचा सुधारित विकास आराखडा पुढील दीड ते दोन वर्षात तयार होईल अशी माहितीही त्यांनी दिली.