ठाकरे गटाचे प्रमुख नेते स्वतःच्या चिन्हावर का नाहीत ?
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांमध्ये वेगवेगळी राजकीय उलथापालथ दिसून येत असताना, आम आदमी पक्षाच्या धाडसी पावलाने स्थानिक राजकारणात नवा रंग भरला आहे.
भाजपची सर्व १७ जागांवर उमेदवारी; प्रचारात आघाडी
भाजपने कमळ चिन्हावर नगरपंचायतीतील सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रचाराची आक्रमक सुरुवात केली असून स्थानिक राजकारणात भाजप आपली पकड कायम ठेवण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
शिवसेना ठाकरे–शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एसपी गट एकत्र
राज्यात एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे ठाकरे गट आणि शिंदे गट कणकवलीमध्ये मात्र एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानेही या दोघांना पाठिंबा देत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पक्षांनी स्वतःच्या अधिकृत चिन्हांवर उमेदवार न उभा करता ‘क्रांतिकारी विचार पक्ष’ या नावाच्या पक्षाच्या तिकिटावर उमेदवार उभे केले आहेत.
ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि युवानेतृत्व ‘इतर’ पक्षाच्या चिन्हावर का?
या आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. मात्र दोघेही स्वतःच्या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक न लढवता ‘क्रांतिकरी विचार पक्ष’च्या तिकिटावर उभे आहेत.
या निर्णयामागील कारणांबद्दल जिल्ह्यात मोठी चर्चा असून स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते, उमेदवार तडजोडी आणि चिन्हासंबंधी शक्य तितक्या रणनीतीबाबत अनेक तर्कवितर्क रंगले आहेत.
आम आदमी पक्षाचा ‘स्वाभिमानी’ निर्णय
दरम्यान, भाजप आणि पालकमंत्री राणे यांच्या राजकीय प्रभावामुळे इतर प्रमुख पक्षांनी आपली अधिकृत चिन्हे बाजूला ठेवत आघाडी मार्ग निवडला असतानाच आम आदमी पक्षाने मात्र स्वतःच्या झाडू चिन्हावर प्रभाग क्रमांक ३ मधून संजय पवार आणि प्रभाग क्रमांक ८ मधून विठ्ठल उर्फ राजू कासले असे दोन उमेदवार उभे करून स्वतंत्र व स्वाभिमानी भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या ‘आप’च्या या निर्णयाचे स्थानिकांमध्ये स्वागत होत असून स्वच्छ राजकारणाचे प्रतिक म्हणून झाडू चिन्ह कायम ठेवून त्यांनी विश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणूक बहुपदरी, बहुपक्षीय आणि राजकीय प्रयोगांनी भरलेली ठरणार यात शंका नाही. भाजपची आक्रमक लढत, शहर विकास आघाडीची संयुक्त चाचपणी आणि ‘आप’ची स्वतंत्र वाटचाल— या तिन्ही दिशांनी राजकारणात रंगत वाढली आहे.i



