कणकवली – कृषी विधेयकविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि सरकारने आणलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस एम. एम. सावंत, कणकवली तालुका उपाध्यक्ष विजय कदम, तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर, संदीप कदम, प्रकाश घाडीगांवकर, प्रदीप तळगावकर, प्रदीपकुमार जाधव, बी. के. तांबे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान सध्या दिल्लीच्या रस्त्यावर देशातील शेतकऱ्यांनी कृषी विधेयकविरोधात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने अनेक प्रकारचे अमानुष अत्याचार चालवले आहेत. प्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी जशी खंदक खोदली जातात तशीच खंदक या आंदोलकांना रोखण्यासाठी खोदली गेली ही निंदनीय बाब आहे असेही यावेळी प्रदीप मांजरेकर म्हणाले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयासमोर आज काँग्रेसचे धरणे आंदोलन सुरू असून आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचे ते यावेळी म्हणाले.
तर केंद्राच्या या काळ्या कायद्याविरोधात आमची लढाई सुरू राहणार असून वेळ हा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू वेलपडल्यास मोठ जनआंदोलन उभारलं जाईल असे मत जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांनी व्यक्त केले.
यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.