कणकवलीतील महामार्ग भिंत प्रकरणी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार, पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

0
366

 

सिंधुदुर्ग – कणकवली शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याच्या घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कणकवली शहरातील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत दोन दिवसापूर्वी कोसळली होती त्या घटनेची पाहणी पालक मंत्री उदय सामंत यांनी आज केली. यावेळी ते म्हणाले, कणकवली शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी कणकवलीकर यांनी केल्या होत्या त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी हायवे अधिकारी आणि हायवे ठेकेदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावून कामातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते तरीही चौपदरीकरण कामात दर्जा राखण्यात आलेला नाही चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याने नागरिकांच्या जीवितास ही धोका निर्माण झाला आहे. या अनुषंगाने आज मी हायवेच्या मुख्य अभियंत्यांशी बोलणार आहे त्यानंतर कणकवलीतील घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होईल आणि यातील दोषींवर कारवाई होण्यासाठी आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत.असेही ते म्हणाले. पालकमंत्री यांच्या समवेत आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उप विभागीय पोलीस अधिकारी कटेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here