लॉनडाऊन’ काळात कंटेनरच्या बंद हौद्यात बसून सिंधुदुर्गातून राजस्थानच्या दिशेने प्रवास करणारे 11 प्रवासी आणि चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फोंडाघाट चेकपोस्ट येथे शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हे प्रवासी राजस्थान, हरियाणा या भागातील असून ते विविध वाहनांचे चालक, क्लिनर आहेत. ‘लॉकडाऊन’च्या कारणास्तव गोवा पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. गेले तीन-चार दिवस तेथेच अडकून पडलेल्या या चालकांनी छुप्या पद्धतीने कंटेनरमधून आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले.
ताब्यात घेतलेल्यांमधील आठजण राजस्थान, दोघे हरियाणा तर दोघे महाराष्ट्राचे आहेत. या प्रवाशांसोबत एक अल्पवयीन मुलगाही होता. हे सर्वजण प्रवास करत असलेला कंटेनरही ताब्यात घेण्यात आला आहे.
कंटेनरमधून गाव गाठण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’ असल्याने पोलिसांची पथके विविध ठिकाणी कार्यरत आहेत. असेच एक पथक फोंडाघाट चेकपोस्ट येथे होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर (एचआर-69/बी-6446) कोल्हापूरच्या दिशेने जात होता. पोलिसांनी कंटेनर थांबवून तपासणी केली असता मागील पूर्णपणे बंद असलेल्या हौद्यात वरील प्रवासी आढळून आले.
प्रवासी भुकेने व्याकूळ
घटनेची माहिती समजल्यानंतर काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. हे सर्व प्रवासी भुकेने व्याकूळ झालेले होते. मागील तीन दिवसांपासून आपण उपाशी असल्याचे ते सांगत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना बिस्कीट, पाणी व अन्य काही खायला दिले. त्यानंतरच्या चौकशीत या प्रवाशांनी मागील तीन – चार दिवसांपासून भोगावा लागलेला त्रास कथन केला.
‘लॉकडाऊन’मुळे सीमेवरच अडकले
सर्व प्रवासी विविध वाहनांचे चालक, क्लिनर असून ते राजस्थान, हरियाणा आदी भागांतून काही माल घेऊन गोव्याला जात होते. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गोव्यातही ‘लॉकडाऊन’ असल्याने तेथील पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. परिणामी तेथे अनेक वाहने व त्यांचे चालक, क्लिनर अडकून पडले होते. हातावर पोट असणाऱया या चालक-वाहकांवर पैशांअभावी उपाशी राहण्याची वेळ आली होती. कारण, वाहनांच्या मालकांनी देखील यापुढे काही दिवस कामबंद असल्याने या चालक, क्लिनरांना त्यांच्या खात्यावर पगार पाठवत ‘मागे येण्याचा मार्ग तुम्हीच शोधा’ असे सांगत हात झटकले होते. परिणामी, सर्वजण जिथे अडकून पडले होते. तर एटीएमही मिळत नसल्याने तसेच क्वचितच उघडय़ा दिसणाऱया दुकानांमध्ये जेवण्याच्या वस्तू विकत घ्यायला गेल्यावर दुकानादारांकडूनही त्यांना नकार मिळत असल्याने सर्वांना गेले तीन-चार दिवस उपाशी राहावे लागले होते.
कंटेनरमधून गाव गाठण्याचा प्रयत्न
अखेरीस त्या परिसरात अडकून पडलेले काहीजण एकत्र आले. यातील बहुतांश राजस्थान येथील असल्याने त्यांनी वाहने तेथेच ठेवत हळहळू चालत गोव्याच्या हद्दीतून सिंधुदुर्गच्या हद्दीत ‘एन्ट्री’ केली. त्यांना हरियाणा व महाराष्ट्रातीलही चालक येऊन भेटले. सिंधुदुर्गच्या सीमेवर आल्यानंतर त्यांना गोव्यातून येणारा कंटेनर दिसला. त्यांनी चालकाला कंटेनरमधून राजस्थानला नेण्याची विनंती केली. या सर्वांचे हाल पाहून चालकाने त्यांना कंटेनरच्या हौद्यात बसविले. हा सर्व घटनाक्रम सांगताना त्यांचे डोळेही पाणावले.
गुन्हा दाखल, नोटीस देऊन सोडले
अखेरीस या सर्वांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सर्वप्रथम पोलिसांनीही त्यांच्या खाण्या – पिण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची कसून तपासणी करण्यात आली. त्यांची ओळखपत्रे, लायसनही पोलिसांनी तपासली. अखेरीस सर्वांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 188, 269, 270, 271 साथरोग अधिनियम, मोटारवाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. मात्र, ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे हे प्रवासी जाणार कुठे, हा प्रश्न अनुत्तरीतच होता.
घटनेची फिर्याद कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांनी कणकवली पोलिसांत दिली. कारवाईत उपनिरीक्षक धनश्री पाटील, हवालदार दयानंद चव्हाण, कॉन्स्टेबल चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस झरकर, जारंडे सहभागी झाले होते.



